आरसा रूप प्रतिबिंबित करतो हे सर्वांनाच ठाऊक असेल…परंतु आरसा वास्तुतील शुभ अशुभ गोष्टींसह कौटुंबिक मनः स्वास्थ्य, आरोग्य आणि वास्तुतील सकारात्मक, नकारात्मक उर्जासुध्दा परावर्तित करत असतो हे सर्वांना ठाऊक असेलंच असे नाही !… – वास्तुविशारद, संतोष राठी (आदित्य वास्तु)
वास्तुशास्त्राधारीत वास्तुतील आरशाचे अनन्य साधारण महत्व….
आरसे, वास्तुमधील परिसर, संपत्ती, आरोग्य आणि समृध्दि द्विगुणित करतात.
येणाऱ्या काळात मी सुखी व आनंदी होईन, अशी अपेक्षा बाळगण्यापेक्षा, आज, आत्ताच्या क्षणात आनंद भरा, आपले दैनंदिन जीवन हे आरशासमान असून आपली प्रत्येक कृती, वस्तु वा वास्तुवास असो किंवा वास्तविक जीवन हे या आरशात प्रतिबिंबीत होत असते. अशा या आरशांचे वास्तुशास्त्राधारीत वास्तुतील महत्व अनन्य साधारण आहे, वास्तुशास्त्रात आरशांचा वापर हा वास्तुतील कानाकोपऱ्यातील जागा किंवा योग्य दिशा पाहून केला जातो. आरशांमध्ये जे दिसते ते प्रतिबिंबित परावर्तित करण्याचा गुणधर्म असल्याने, त्यांची योग्य ठिकाणी योग्य रचना केल्यास कानाकोपऱ्यातील याच निमुळत्या जागासुध्दा जितक्या प्रशस्त आणि दुप्पट मोठ्या दिसतात, तितक्याच संपत्ती, आरोग्य आणि समृध्दिसुध्दा द्विगुणित करतात.
वास्तुमधील आरशांच्या उत्तम दिशा आणि उचित ठिकाणे…
आरसे, नकारात्मक उर्जा वास्तुबाहेर ठेवून, सकारात्मक उर्जाशक्ती वास्तुमध्ये निर्माण करतात
दर्पण झूठ ना बोले!… आरसा कधीच खोटे बोलत नाही, इतकंच नाही तर आपल्या दैनंदिन जीवनात बऱ्या वाईट प्रत्येक प्रसंगात, पदोपदी आरसा दाखवणाऱ्या या आरशांची स्थिती आणि स्थान, दिशा आणि रचना ही वास्तुशास्त्रानुसार असेल तर, असे आरसे अतिथींचे लक्ष वेधून तर घेतातच परंतु नकारात्मक उर्जा वास्तुबाहेर ठेवून, सकारात्मक उर्जाशक्ती वास्तुमध्ये निर्माण करतात व परिणामी आरोग्यदृष्ट्या हेच आरसे रक्ताभिसरण वाढीस पूरक पोषक ठरतात. याशिवाय कौटुंबिक घर किंवा कोणत्याही व्यावसायिक वास्तुचे पारदर्शी रूपसौंदर्यं अधिक खुलवतात.
वास्तुंमधील आरशांसाठी योग्य दिशा, भिंती व योग्य आकार…
आरसे, जिसके अनुकूल तितकेच प्रतिकूल परिणाम सुध्दा परावर्तित करत असतात.
अनुकूल उत्तर-पूर्व दिशा – आरशांमध्ये पाण्यासारख्या घटकांतील प्रतिबिंबित करण्याचा गुणधर्म असल्यामुळे तुम्ही वास्तुच्या उत्तर अथवा पूर्व भिंतींवर आरसे लावू शकता. कारण उत्तर आणि पूर्व दोन्ही दिशा जल या घटकाला पूरक आणि पोषक ठरतात. याठिकाणचे आरसे ठरवताना मुख्यत्वे उत्तर दिशेच्या भिंतींसाठी चौरस आकाराचे (चौकोनी) आरसे, तर पूर्व दिशेच्या भिंतीसाठी गोल आकाराचे आरसे टाळावेत. या दोन्ही दिशांसाठी आयताकाराचे आरसे उत्तम प्रभावशाली ठरतात.
अनुकूल ईशान्य दिशा – ईशान्य दिशेच्या भिंर्तीवरिल आरशांची स्थिती आणि स्थान पहाता, ईशान्य दिशेलाही या जल घटकाचे प्राबल्य असते. त्यामुळे वास्तुच्या ईशान्य दिशेच्या भिंतींवरिल आरसे देखील प्रेरक ठरतात. वास्तुतील निमुळत्या कानाकोपऱ्यातील कटस् किंवा त्यामुळे संभावित वास्तुदोष दूर करण्यासाठी ईशान्य भिंतींवर आरशांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. गोल किंवा आयताकृती आकाराचे आरसे ईशान्य दिशेसाठी अधिक आनंद व लाभदायी असतात.
अनुकूल पश्चिम दिशा – पश्चिम दिशेच्या भिंतीवरिल आरशांची स्थिती किंवा स्थान पहाता, वास्तुरचनेनुसार पश्चिम दिशेला कोनाडे, किंवा कटस् असतील तर, येथील आरशांमुळे पश्चिम दिशेच्या भिंर्तीची पॉवर अर्थात सकारात्मक उर्जा ही वाढीस लागते. तसेच यासाठी गोल अथवा चौरस आकाराचे आरसे अधिक प्रभावी ठरू शकतात.
प्रतिकूल दक्षिण-पूर्व दिशा (अग्नेय) – दक्षिण पूर्व दिशेच्या भिंतींवरिल आरशांची स्थिती पहाता या बाजूंस आरसे बिलकूल लावू नयेत. कारण ही स्थिती दक्षिण पूर्व क्षेत्र अग्नि या घटकाद्वारे नियंत्रित केली जाते, जी पाण्यासारख्या घटकाच्या अगदी विरुध्द असते. अग्नेय दिशेला आरसे लावल्यास ते आगीत पाणी टाकण्यासारखे आहे. व परिणामी अग्नि आणि पाणी दोन्ही घटक बाहेर फेकले जाऊन घरात गंभीर अडिअडचणी निर्माण होतात. तसेच दक्षिण पूर्वेस आरसे बसविल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान, अकस्मात अपघात तसेच शारीरिक आरोग्यदृष्ट्या अपायकारक समस्या निर्माण होऊ शकतात.
प्रतिकूल दक्षिण दिशा – दक्षिणेकडच्या भिंतीवरिल आरशांची स्थिती विचारात घेता ही दिशा देखील यासाठी प्रतिकूल ठरते. या दिशेला आरसे लावल्याने वास्तुतील उर्जा नष्ट होण्याची शक्यता असते. दक्षिण भिंतींवर आरसे लावणे म्हणजे तुमचे न्यायालयीन खटले, कायदेशीर कामकाजातील समस्यांना आमंत्रणच ठरु शकते. तसेच अशा वास्तुतील आरसे वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांच्या सामाजिक प्रतिष्ठेला धोका पोहोचवू शकतात.
प्रतिकूल दक्षिण – पश्चिम दिशा (नैऋत्य) दक्षिण पश्चिम दिशेच्या भिंतीवरिल आरशांची स्थितीसुध्दा तशी प्रतिकूलंच आहे. भौगोलिक दृष्ट्या या दिशांवर पृथ्वीवरिल नैसर्गिक घटकांचे वर्चस्व (पंचमहाभुते) दिसून येते. ज्यामुळे या दिशांना आरसे लावू नयेत. परिणामी कौटुंबिक मतभेद, कलह संभवतात. यामुळे पैशांच्या सुरक्षिततेवर देखील नियंत्रण येऊ शकते. तसेच यादिशेचे आरसे हे तुमचे व्यर्थं खर्चं दामदुप्पट वाढवू शकतात.
वास्तुरचना अनुसार बेडरुम्समधील आरशांचे प्रतिकूल अनिष्ठ ठिकाणे
आरशांचे चुकीचे स्थान मानसिक परिणामांबरोबरंच कौटुबिक कलहासही कारणीभूत ठरु शकतात.
वास्तुशास्त्राच्या दृष्टीकोनातून वास्तुरचना अनुसार बेडरुम्समध्ये आरशांसाठीचे योग्य स्थान काय असावे, याचा सांगोपांग विचार केला असता बेडरुम्समध्ये आरसे हे कोणत्याही परिस्थितीत अनुकूल ठरत नाहित. याऊलट ते टाळणेच योग्य. कारण येथील आरसे हे सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही उर्जाना प्रतिबिंबित करतात. बेडरूम्समध्ये गाढ झोप न येणे, अस्वस्थ वाटणे असे प्रकार यामुळे घडू शकतात. कारण आरसे शयनगृहाच्या सभोवतालातील उर्जा आकर्षित करतात. बेडरुममध्ये झोपण्याच्या चुकीच्या दिशेशिवाय, आरशांचे चुकीचे स्थान हे तुमची मानसिक चिंता वाढवू शकते, अस्वस्थता निर्माण करू शकते. या दोन्ही अवस्थेत बेडरुममधील पाण्यासारख्या घटकाची लक्षणं कारणीभूत असतात. यासाठी बेडरुममध्ये आरसे बसविण्यापूर्वी विशेषतः बेडच्या समोरील भिंतीवर ते असू नयेत. मूळ वास्तुशास्त्राधार देखील हेच सांगतो की शयनगृहात झोपताना आपल्या शरिराचा कोणताही भाग आरशात प्रतिबिंबित होऊ नये. कारण परिणामतः कुटुंबात कलह, वादविवाद संभवतात याबाबत दुमत नाही. यामागील वास्तविक तर्क असे सांगतो की बरीच कुटुंब ही अशा बेडरुम्समधील आरशांद्वारे परावर्तित होणाऱ्या उसळत्या उर्जांना रोखू शकत नाहित, हाताळू शकत नाहित.
बेडरुम्समधील आरसे… पर्याय व उत्तम उपाय
तुमच्या बेडरुममध्ये उदा. आरसा, ड्रेसिंग टेबल असेल तर ते बेडच्या दिशेने तोंड केलेले नसावे याची दक्षता घ्या. वास्तुशास्त्रानुसार ड्रेसिंग टेबलचे तसेच कोणत्याही ठिकाणच्या आरशांचे योग्य स्थान हे बेडच्या बरोबर विरुध्द बाजूस ( दडलेले) असावे, जेणेकरून ते थेट अंथरुणावरुन नजरेस येणार नाही. हा पर्याय असला तरी याऐवजी उत्तम उपाय म्हणाल तर हेच आरसे जर का तुम्ही बैठकीच्या (हॉल) खोलीमध्ये बसवले तर उत्तम. कायमस्वरूपी आरसा लावण्याऐवजी गरजेपुरता ठेवण्यासाठीच्या योग्य दिशा विचाराल तर उत्तर पूर्व, ईशान्य व पश्चिमे दिशेच्या भिंती.
बेडरुम्समधील आरशांची स्थिती व स्थाने ही वास्तुशास्त्राचे पालन करु शकत नसल्यास, यावरचा उत्तम पर्याय म्हणजे हे आरसे कापडाने किंवा पट्ट्यांनी झाकून ठेवणे किंवा कपाटे, ड्रावर्समध्ये ठेवणे आवश्यक आहे.
वास्तु व वास्तुशास्त्रानुसार बैठकीच्या (हॉल) खोलीतील आरशांची स्थिती व स्थान
योग्य दिशातील आरसे, तुमच्या वास्तुसाठी विपुल समृध्दीची सुलक्षणे असतात.
वास्तुशास्त्रानुसार वास्तुतील बैठकीच्या खोलीत आरसे बसविल्याने जागा प्रशस्त व वाढल्यासारखी दिसते. यासाठी आरसे विविध उत्कृष्ट आणि आधुनिक डिझाईन्स उपलब्ध होऊ शकतात. नव्हे तर हॉलमधील अशाप्रकारच्या आरशांना नामांकित इंटेरियर डिझायनर्स सर्वोच्च पसंती देतात. बैठकीच्या खोलीमध्ये आरशांचे स्थान व स्थिती निश्चित करताना याठिकाणी वास्तुशास्त्राधारित नीती नियम आपण प्रथम लक्षात घेणे गरजेचे आहे. याशिवाय आरशांच्या जागा सुनिश्चित करताना ते हॉलमधील तसेच सभोवतालातील सकारात्मक गोष्टींसह बाग बगिचा, फुलझाडे प्रतिबिंबित करतील अशा पध्दतीने बसवावेत. जी तुमच्या वास्तुसाठी विपुल समृध्दीची सुलक्षणे असतात. याऊलट वास्तु बाहेरील अप्रिय वस्तु, अप्रिय घटना गर्दी गोंगाट परावर्तित करणारे आरसे आपल्या वास्तुतील नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढवू शकतात.
वास्तुशास्त्रानुसार बाथरुमम्स मधील आरशांच्या योग्य अयोग्य जागा
आरसे, लहान आकाराचेच आरसे बाथरूममध्ये वापरणे उत्तम व हितकारक
बाथरुम मधील आरसे हे टॉयलेट सीट / डब्ल्यू.सी प्रतिबिंबित करणारे असू नयेत. कारण त्यामुळे असे आरसे नकारात्मक उर्जा अधिक वाढवू शकतात. तसेच बाथरुम मधील गडद रंगांच्या कानाकोपऱ्यांना प्रतिबिंबित करतील अशा पध्दतीने आरसे लावू नयेत, त्यामुळे बाथरुममध्ये अंधार वाढू शकतो. (२ फूट बाय ३ फूटांपेक्षा मोठे नसलेले) लहान आकाराचे आरसे बाथरुममध्ये वापरणे उत्तम. त्याचबरोबर बाथरूमच्या दरवाजांवर आरसे लावू नयेत, कारण ते खोलीत किंवा राहण्याच्या क्षेत्रामध्ये परिणामकारक उर्जा प्रतिबिंबित करु शकतात.
आपल्या वास्तु आणि वास्तविक दैनंदिन जीवनातील अनुकूल, प्रतिकूल घडामोडींचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या सकारात्मकता, नकारात्मकतेच्या उर्जास्त्रोतांना परावर्तित करणाऱ्या आरशांना वास्तुशास्त्रानुसार, आपल्या वास्तुत योग्य स्थितीत योग्य स्थानीच स्थानापन्न करा आणि सफल, समृध्द आयुष्याबरोबर सर्वसंपन्न भविष्याची प्रचिती घ्या, परावर्तित वास्तुसौख्याचा सहवास अनुभवा!….
Comments