top of page

पश्चिमेकडील देवघर, ठरेल समृद्धीचा सागर!


DevGhar
पश्चिमेकडील देवघर

' सर्व सुखांचे आगर, करते अचूक देवघर.' ही उक्ती आपल्याकडे रूढ आहे. ते खरंही आहे . देवघराची दिशा अचूक नसेल तर दैवी कृपा आणि पुण्याचाही ऱ्हास होतो. तसेच दैवी कोपालाही माणसाला सामोरं जावं लागतं. म्हणूनच घरातील देवघराबाबत वास्तूशास्त्रात सखोल अभ्यास करून विस्तृत माहिती देण्यात आली आहे. बहुसंख्य वास्तू तज्ज्ञांनी देवघर नेहमी वास्तूच्या ईशान्य दिशेस असावे, यावर जास्त भर दिला आहे. मात्र वस्तुस्थिती खूपच वेगळी आहे, हे सांगण्यासाठीच ह्या ब्लॉगचे प्रयोजन आहे. ज्यामुळे देवघराविषयीचे अनेक गैरसमज दूर होतील.


'जहाँ डाल डाल पर सोने की चिडीयाँ करती है बसेरा। वह भारत देश है मेरा॥' हे सुप्रसिद्ध गाणं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. ह्या गाण्यातील शब्द न् शब्द खरा आहे. एकेकाळी भारतासारखा सर्वार्थानं समृद्ध देश, जगाच्या पाठीवर नव्हता. शेती, विपूल खनिज संपत्ती, जीवन जगण्यासाठी पोषक वातावरण ह्या उपलब्धतेमुळे भारतावर परकीय आक्रमणे सातत्यानं होत राहिली आहेत. आजही होतच आहेत. भारत देश सधन होता, आहे आणि राहील. ह्यामागे प्रमुख कारण म्हणजे, वरुणदेवाची भारतावर राहिलेली अपार कृपा. वरुणदेवाच्या कृपेमुळेच सर्वाधिक सुबत्ता लाभलेल्या भारताची हानी केली गेली . शेकडो वर्षे पारतंत्र्य विरुद्ध लढा देऊन भारताने स्वातंत्र्य मिळवले, भारताला लाभलेली गहन ज्ञानसंपदा जगभराने आत्मसात केली. योगाभ्यास, आयुर्वेद, ज्योतिष शास्त्र आणि वास्तू शास्त्राचाही प्रामुख्यानं समावेश आहे. वेदांवर आधारित वास्तू शास्त्रानुसार, परकियांनी आपल्या धार्मिक स्थळांची उभारणी केली. कारण भारतातील प्रमुख विख्यात मंदिरं पश्चिम दिशेस स्थित असल्याचे, त्यांच्या लक्षात आले होते. सुप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर असो की, सर्वाधिक श्रीमंत पद्मनाभ मंदिर, सुवर्ण मंदिर असो किंवा जैन स्थानक आणि देरासर असो - ही मंदिरं उदाहरणादाखल घेता येतील. म्हणूनच की काय परदेशातील मंदिरंही पश्चिम दिशेलाच बांधण्यात आल्याचे दिसून येते. उदाः पाश्चात्य देशातील चर्चेस व इतरही प्रार्थनेच्या वास्तू, पश्चिम दिशेलाच निर्माण केल्याचे दिसते. जगातील सुप्रसिद्ध चर्च व्हेटिकन सिटी येथील सेंट पीटर्सबर्ग बासिलिका पश्चिम दिशेलाच बांधण्यात आले. जिथे जिजसचे मुख पूर्व दिशेला आहे. प्रार्थनाकर्ता पूर्वेकडून पश्चिमेकडे तोंड करून प्रवेश करतो. अगदी तसेच काबामधील मक्का - मदिनास जायचे झाल्यास, पूर्वेकडील 'अल् - सलाम' प्रवेश व्दारातून पश्चिमेकडील प्रार्थना स्थळाकडे जावे लागते. सिख बांधवांचे अमृतसर येथील सुवर्ण मंदिर आणि तेथील त्यांच्या 'गुरु ग्रंथ साहेब' ह्या पवित्र धर्मग्रंथाची स्थापना ही पश्चिम दिशेस झालेली आहे. सिंधी धर्मगुरू झुलेलाल यांचे धर्मस्थळही पश्चिम दिशेस आढळते.अशा प्रकारे हिंदू, मुस्लिम, शीख, सिंधी, बौद्ध ,जैन, ख्रिश्चन बांधवांचे प्रार्थना स्थान पश्चिमेकडेच उभारले गेलेले दिसते. जगातील जे प्रमुख धर्म आहेत, त्यांच्या प्रार्थना स्थळाची स्थापना पश्चिम दिशेस झाली आहे. हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. ह्यामागे शास्त्रीय कारण निश्चितच आहे. देवस्थानाचे मुख पूर्वेकडे आणि प्रार्थनाकर्त्याचे मुख पश्चिमेकड़े असल्यास, मनोकामनांची लवकर पूर्ती होते, हे हजारो वर्षांपासून सिद्ध होत आले आहे. त्यामुळे पश्चिम दिशेचे असे काय वैशिष्ठ्य आहे, ज्यामुळे ते प्रार्थना स्थळ अधिक पवित्र व शक्तिशाली हे अभ्यासणं अगत्याचं आहे.


प्राचीन वैदीक धर्मात देवतांचे देवता हे वरूण देवता असा उल्लेख करण्यात आला आहे. वैदिक धर्मानुसार वरुण देवाचे स्थान सर्वोच्च स्थान असले तरी त्याचे प्राकृतिक गुणवर्णन शब्दात करण्यासारखे नाही. कारण वेदातून वरूण देवतेचे रूप अमूर्त मानले आहे.

वेदोत्तर काळात मात्र वरूण देवता सर्व देवतांना पूरक व संलग्न अशी संबोधण्यात आली. अशा वरूण देवतेचे अधिष्ठान पश्चिम दिशेला आहे. त्यामुळे पश्चिमेकडील देवस्थानांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. भौगोलिकदृष्ट्या कोणत्याही देवस्थानाची डिग्री बदलून पाहिल्यास, त्या ठिकाणी वरूण देवतेची प्रतिष्ठापना झाल्याचे दिसून येते. वरूणदेव जलाचे मुख्य स्रोत आहेत. संपूर्ण पृथ्वी ही ७०% जलाने व्याप्त आहे. पंचमहाभूतात जलाचे स्थान सर्वोच्च मानले गेले आहे. प्राचीन काळापासून वरूणदेवाला सिध्द पुरूष मानण्यात आले आहे. कारण ब्रह्मांड पुराणानुसार पृथ्वीची निर्मिती जलतत्वापासून झाल्याचे वर्णिले आहे. जीव निर्मितीआधी संपूर्ण भूतल जलमय होते. त्यामुळे सर्वप्रथम जलाचे पूजन किंवा जलशिंपण करून पूजेस प्रारंभ करण्याचा प्रघात आहे. आधुनिक विज्ञानात जल हे सर्वाधिक संवेदनशील असल्याचेही सिद्ध झाले आहे.



इंद्रदेव
इंद्र देव

पूर्व वैदिक काळात वरूण देवता ही सर्वोच्च मानली गेली होती. नंतर वैदिक काळात इंद्रदेवतेला सर्वोच्च स्थान प्राप्त झाले. आणि कालौघात वरूण देवतेला देवांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त झाले. ऋषि कश्यप आणि आदिती यांचा अकरावा पुत्र म्हणजे वरूण देव, त्यांची पत्नी चर्षणी आणि वाहन मगर आहे.

वरुण देवता नैतिक शक्तीला पोषण देते. ऋग्वेदातील सातव्या मंडलानुसार वरूण देवतेला अमोघ व अव्दितीय, जादुई शक्तीचा प्रदाता मानले जाते. ते संपूर्ण सृष्टीचे नियामक व शासक आहेत. संपूर्ण सजीव सृष्टी व जीवमात्रांचे ते पालकपोषक आहेत. वरूण देवता सत्यप्रिय असल्याने, सत्यनिष्ठ व्यक्तीस विपुल समृद्धी प्रदान करतात. ऋतू परिवर्तन दिवस व रात्रीचा कर्ता - धर्ता, पृथ्वी, सूर्याचा निर्माता म्हणून वरूण देवाकडे ॠग्वेद पाहते. वरूण देवतेला एक सहस्त्र नेत्र असून तो जिवांचा निरीक्षक म्हणून कार्य करतो. ज्याचे जसे कर्म, तसे त्याला फळ देतो. ह्यामागील महत्वाचे कारण म्हणजे, पश्चिम दिशेवर वरूण देवता आणि शनिदेवाचे अधिपत्य असते. म्हणूनच पश्चिम दिशा समृध्दी व कर्माचे फळ देणारी दिशा मानली गेली आहे.




वरूण देव
वरूण देव

वरूण देवाचे सहाय्यक पुष्पदंत आहेत. ते सदैव त्यांच्या उजवीकडे उपस्थित असतात. पुष्पदंत हे देवांचे पुरोहित होते. ते उत्तम श्रोते तर आहेतच परंतु उत्तम कार्यवाहक देखील आहेत त्याच्यासाठी लागणारे नियमांची अंमलबजावणी करण्याची क्षमता ही त्यांच्यात आहे, ते गंधर्व राज आहेत आणि श्री शंकराचे सहाय्यक मानले जातात.पूजेचे नियम व विधी तेच निश्चित करत असत. पुष्पदंतास इंद्राचे वाहन, गरूड, नंदी आदी रूपातही पाहिले जाते. वरूण देवांच्या डावीकडे असूर देवता विद्यमान असते. असूर देवतेतही उत्तम गुण असल्यामुळे, वरूण देवांच्या उजवीकडे त्यांना गौरवाने स्थान देण्यात आलं आहे. असुर आणि देवता, देवी आदितीचे पुत्र आहेत. असूर हे देवतांचे ज्येष्ठ बंधु असल्याने व वरूण देव हे देवांप्रमाणेच असूरांचेही देवता असल्याने वरूण देवाजवळ सहाय्यक म्हणून उपस्थित असतात. वरूण देवांच्या समोरील स्थान मित्र देवतेचे स्थान मानले गेले आहे. मित्र देवता व्यक्तीच्या धर्मानुकरण आणि कर्मफलित यांना प्रवृत्त करत असते अर्थ असा की, वरूण देवाला पश्चिमेकडे मुख करून जी व्यक्ती नमस्कार करते, ती व्यक्ती मित्र देवतेच्या सानिध्यातवरूण देवाची सखा मानली गेली आहे. पश्चिमेकडे मुख करून जी व्यक्ती नमस्कार करते, त्याची इच्छापूर्ती लवकर होते.


इथं आवर्जुन सांगायचे झाल्यास, वरूण देवता कार्य सिद्धीत काही बाधा असल्यास, त्या बाधा वरूण देवता तत्परतेने दूर करण्यासाठी साह्यभूत ठरतात. एखाद्या व्यक्तीने अतीव कष्टाने यश प्राप्त केलेले असते. परंतु त्याचे दिवस अचानक फिरतात आणि त्याच्या यशाचा डोलारा कोसळतो. समर्थ असूनही सतत अपयशांस सामोरे जावे लागते. सतत कार्यात अडथळे निर्माण होतात. ती व्यक्ती हताश होते. असं होण्यामागील कारणेही त्याला ठावूक नसतात. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे, वरूण देवता आणि त्यांच्या पुष्पदंत व असूर देवता सहाय्यकांच्या कृपेचा असणारा अभाव होय. म्हणूनच वरूण देवता, पुष्पदंत व असूर देवतेची कृपा प्राप्त करून घेणे अशा वेळी क्रमप्राप्त ठरते.


वरूण देवता द्रष्टा आणी उत्तम निर्णय क्षमतेचे कारक आहेत, भौतिक सुख सोयींना प्रवृत्त करणारी ही देवता आहे. इच्छापूर्तीलाही ते साह्य करतात. तसेच देवांचे पुरोहित पुष्पदंत येथे सहाय्यक असल्यानं, पूजन विधीही सफल होतो. शिवाय असूर देवतेचे सान्निध्य असल्याने व्यक्ती निडर होऊन, धाडसाने सर्व कामे करू लागते. पश्चिम दिशा ही शनिदेवाचे कारकत्व असल्याने, प्रत्येक परिश्रमाचे फळ मिळतेच. तेव्हा जीवनात आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक किंवा मनोवांच्छित क्षेत्रात प्रगती आणि समृध्दी प्राप्त करायची झाल्यास, श्रेष्ठ अशा वरूण देवतेची कृपा प्राप्त करून घेणे अत्यावश्यक आहे.


ज्योतिष आणि वास्तू शास्त्राचा विशेष निकटचा संबंध आहे. ज्योतिष शास्त्रात दहावं स्थान हे कर्माचं आणि अकरावे स्थान हे इच्छापूर्तीचे असते. त्या स्थानात काळ पुरूषाच्या कुंडलीत 'मकर' आणि 'कुंभ' रास येते. ह्या दोन्ही राशी शनिदेवाच्या आधिपत्याखाली येतात.

आणि शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत त्यामुळे जर पश्चिम दिशेला देवघर असेल तर पूर्वेकडून होणाऱ्या सूर्योदयामुळे शनि देवावर सूर्याची कृपा बरसतेच त्याचबरोबर ती कोवळी रश्मी किरणे ही देवघराच्या व तिथल्या मूर्तींच्या चरणांना स्पर्श करते तेव्हा तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ,ही त्या मंदिरात नतमस्तक होणाऱ्या भक्तांवर आपला विशेष प्रभाव पाडते.

एकूणच व्यक्तीची राशी कोणतीही असो, त्या व्यक्तीवर पश्चिमेचे महाराजा, सर्व सुख - समृध्दीदाता वरूण देवतेचा कृपाहस्त असायलाच हवा.



एव्हाना पश्चिम दिशा आणि तेथील देवतांचे अनन्य साधारण महत्त्व तुमच्या लक्षात आले असेलच. अशा प्रकारे पश्चिम दिशेची देवस्थाने माणसांच्या जीवनात विधायक आमूलाग्र बदल घडवून आणतात. तेव्हा थोडासा विचार करा, तुमच्या घरातील पश्चिमकडील देवघर तुमच्या जीवनात किती सकारात्मक बदल घडवून आणेल ते! पश्चिमकडील देवघरामुळे तुमच्या घराचे पवित्र व शक्तिशाली मंदिर होण्यास मुळीच विलंब लागणार नाही. कारण पश्चिम दिशेकडील प्रमुख देवता दैवी, भौतिक, आधिभौतिक अशा सर्व देवतांशी संलग्न असल्याने, तिन्ही प्रकारचे लाभ पश्चिम दिशेकडील देवघरापासून हमखास मिळतात. माणसाच्या यशाचा आलेख उंचावत ठेवतात.


पश्चिम दिशेकडील देवघराबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्याशी जरूर संपर्क साधावा. वास्तू तज्ज्ञांकडून आपणास अचूक माहिती मिळेल.

1 view0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page